पाझर तलाव

 पाझर तलाव


आज मुलीबरोबर घराशेजारील मैदानात साठलेल्या छोट्या तळ्यात दगड मारताना मुलीच्या चेहर्‍यावर पाहिलेला निरागस आनंद जुन्या आठवणी ताज्या करून गेला..अन आठवली ती पाझर तलावातील मजा.

उन्हाळ्यात सुट्टी लागली की आम्ही सगळेच गावाकडे. गावाकडे शेतात काम काही नसत फारफार तर भात पिकासाठी लागणारे रोप भाजणे पण सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे… विहिरीत ओतलेला एक टँकर पुणँ वाडीतील लोक एका तासात कसा खाली करतात हे एक लहानपण पाहिलेल आश्चर्य आणी टॅंकर नाही आला तर रात्री विहिरीतील पाण्याच्या झऱ्यात साठलेलं पाणी भरणे मग काय अशी पाणी आणि पाण्यासाठी केलेली वणवण चांगलीच आठवते…

अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे जनावरांना पाण्यासाठी धुण्यासाठी गावाबाहेरील पाझर तलावावर घेऊन जाणे… पाझर तलाव म्हणले की आठवते पाच किलोमीटर पायपीट आधी उतार आणि येताना मेटाकुटीस आणणारा चढ…. सकाळी जेवण करुणच काय ते आम्ही सगळी मुल जनावरे घेऊन पाझर तलावाकडे निघणार… तलावावर पोहचले की बैलांना गाया म्हशींना वासरांना पाणी पाजून धुवून काढणे… धुतानी हातातुन पडलेला साबण आणी ते शोधून काढण्यास केलेली धडपड नंतर बैलाची शेपटी पकडून पोहण्याचा केलेला प्रयत्न अन साबण लावलेली बैलाची शेपूट कधी हातातून निसटून जाते समजत नाही आणि मग बुडता बुडता वाचवा वाचवा म्हणून दिलेली हाक…

अजून एक आवडती गोष्ट म्हणजे सपाट छोटे दगड गोळा करणे आणि पाण्यावर समांतर रेषेत फेकणे ती दगड पाण्याला जेवढ्या वेळा स्पर्श करेल तो जिंकला हे दगड फेकायची कॉम्पिटिशन बराच वेळ चाले .. जोपर्यंत हात दुखत नाही तोपर्यंत आणि तोच काय तो आनंदाचा क्षण जगायला पुन्हा मिळावा कारण तो होता खरा वर्तमानात जगण्याचा आनंद त्या पाण्याच्या लहरींवर बुडलेलं मन परत मिळो…

पाझर तलावावर निम्मा दिवस कधी संपतो समजतच नाही आणि सगळी कामं आटपली की घराकडे वळलेली पावलं निराश होऊन चालतात आणि त्यात आलेला तीव्र चढ मग काय झालेली सगळ्यांची दमछाक… मग कोणी काठी घे ..कोणी म्हशीला पकड …म्हशीवर बसून घरापर्यंत पोहोचणे आणि आणि जाताना लागलेलं कडकडून ऊन …

आज सगळं काही आहे घराच्या समोर पाच हजार लिटरची टाकी आहे …गावाने सगळ्यांना नळाने पाणी द्यायची सुविधा केली आहे ते पण हाकेच्या अंतरावर झालेल्या नवीन पाझर तलावातून….

Leave a Comment