आठवडे बाजार, मिसळ….आणी आजी….
आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट स्थानी भरणारा बाजार होय. या ठिकाणी विक्रेते आपापला माल घेऊन येतात व विक्री करतात.ज्या ठिकाणी भरपूर दुकाने नाहीत व अशी दुकाने असणाऱ्या ठिकाणी जाणे गैरसोयीचे व आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते, तेथे अशा प्रकारचा बाजार भरविला जातो. गावातील आठवडी बाजार ही गावच्या अर्थकारणासाठी महत्त्वाची बाब आहे.
आमच गाव तस लहान फक्त एक किराणामाल दुकान सोडलं की गावात दुसर काही मिळणार नाही मग त्याला पर्याय म्हणुन तालुक्यातील मुख्य गावात भरणारा शुक्रवारचा आठवडे बाजार…लहानपणी हा आठवडे बाजार आम्ही शहरात राहणाऱ्या मुलांना काय समजणार… एकदा असच आजीने 100 रुपये घेऊन मला आणी भावाला आठवडे बाजारात जाऊन भाजी व ईतर बर्याच गोष्टी आणायला सांगितल…मग मी जाम खुश, का तर आजीची भाजी काही माझ्या डोळ्यासमोर नव्हतीच माझ्यासमोर चित्र होत ते रसरसीत तिखट पण चवदार मिसळ…मिसळ ही आजही मला खुप प्रिय , आजही दहा दिवस सुट्टी घेऊन गेलो तरीही त्यातले नऊ दिवस मी मिसळ खाण्यास तालुक्याचा गावात जातो…हे ठरलेलच…
तसच काय ते लहानपणी पहिल्यांदा बाजाराला सकाळच्या एस.टी. ने गेलो…एस.टी स्टँड ला थांबली आणी आमच पाऊल वळाली ती मारुती मंदिरा शेजारील जुन्या हाॅटेलात…ती मिसळ आठवली की आजही तोंडाला पाणी सुटत.. मस्त मापात तिखट अन चवदार मिसळ खाऊन चहा पिऊन आम्ही बाहेर पडलो… नंतर मग पारावर पिंपळाच्या झाडाखाली आजीने सांगितलेली भाजी घेऊन ऊरलेल्या पैशाची लस्सी पिऊन दुपारच्या एस.टी ने घरी…
मग आजीने विचारल काय काय केल?
मी सगळ आहे तस सांगितल , पहिलं काय काय खाल्ल ते नंतर कुठे भाजी घेतली त्यानंतर आजीने जो पान उतारा केला तो असा … आजी म्हणाली , बाळा बाजार भरतो तो हरिश्चंद्राच्या मंदिराजवळ आणी तू भाजी आणली ती नेहमीच्या महागड्या पारावरच्या भाजीवाल्याकडून आणि नेहमीच्या तिच्या गोड शिव्या ऐकून माझ्या डोक्यात प्रकाश पडला …हसलो अन परत दिसली ती मिसळ…. मिसळीच्या नादात मी गर्दीने तुडुंब भरलेला बाजार सोडून भलतीकडेच भाजी घेऊन घरी परतलो होतो …हीच ती आठवण … तसाच आठवडे बाजार बघितला आणि मला ऊर भरून आठवण झाली ती आजीची आणी गावाकडील आठवडे बाजाराची….
मिसळ म्हणूनच मला खूप प्रिय…
…………..🖊©गणेश